आमची गोष्ट
नमस्कार. आमच्या साकव नैसर्गिक शेतीचा (मुं पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली) प्रवास/सुरुवात थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते. (दि. 6 ऑगस्ट 2024)
मी पल्लवी, नवरा विट्ठल, आणि दोन मुली सई आणि स्वस्ति.
मी आणि विट्ठल दोघेही कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल इंजिनीयर. सईने इतक्यातच गणित ऑलिंपियाड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून युरोपियन गर्ल्स मैथ ऑलिंपियाड मध्ये कांस्य पदक मिळवले आहे, मानाची 'स्पिरिट ऑफ रामानुजन' फेलोशिप मागची तीन वर्षे तिला मिळाली आहे. धाकटी ही इन्फोर्मेटिक्स ऑलिंपियाड साठी तयारी करतानाच क्रोशा, व्हिडीयो एडिटिंग इ. गोष्टींमध्ये रस दाखवते आहे. हा झाला भौतिक प्रवास.
विट्ठलने सुभाष पाळेकरांचे आठवडाभराचे शेतीचे शिबिर केले. याच दरम्यान राजीव दिक्षीतांचे काही ऑडियो, अशा बर्याच घडामोडी घडत असतानाच मोठ़्या मुलीचा जन्म झाला. स्वतःच्या घरात, स्वयंपाकघरात खूप बदल आवश्यक आहेत हे लक्षात येऊ लागलं. विट्ठलने शेव्हिंग क्रीम आणि टूथ पेस्ट पूर्ण बंद केली. हे काही आपल्याला जमणार नाही असं म्हणता म्हणता कधी घरातले साबण, शाम्पू, क्लीनर, टूथ पेस्ट बंद झाले तेही समजलं नाही. हळूहळू भांडी घासण्याचे साबण, डिटर्जंट पावडर यांचाही वापर संपला. यासाठी ठोस पर्याय शोधले, विकत मिळायचे ते बरेच महाग वाटले. मग स्वतःच ज्येष्ठ लोकांसोबत बोलून, काही प्रयोग करून पर्याय शोधून काढले. हेमल-जानकीने कचर्यापासून बायो-एंजाईम करायला शिकवले होते, ते गच्चीवरच्या बागेत वापरत होतोच; पण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज चा अभ्यास करून विट्ठलने बरेच वेगवेगळे प्रयोग केले.
हे सगळं करत असतानाच, विना-केमिकल भाज्या, धान्य मिळवण्यासाठी धडपड चालू होती. पाळेकरांच्या शिबिरामुळे, नंतर केलेल़्या शिवारफेर्यांमुळे बरेच शेतकरी जोडले जात होते. त्यांच्या शेतावर जाऊन दर आठवड्याचा भाजीपाला, वर्षभरासाठी धान्य, डाळी वगैरे आणत होतो. कधी शेतकरी नाही मिळाले तर पुण्यातल्या काही सेंद्रिय दुकान(मॉल) मधून विकत घेऊ लागलो. पण मालाची प्रत आणि किंमत या दोन्ही बाबतीत दुकानातल्या मालाबाबतीत समाधानी नव्हतो.
शेजारीपाजारी कधी वाटीभर भाजी दे, कधी अडीअडचणीला भाकरी/चपात्या बनवून दे असं चालू होतं. त्यांनाही चवीत फरक जाणवू लागला. मग त्यांच्यासाठीही भाजीपाला, धान्य घेऊन येऊ लागलो. गाडी भरून माल यायला लागला.
फलटणच्या डॉ. माधव पोळ यांच्याकडे प्रेमाने पिकवलेली अप्रतिम चवीची डाळिंब, चिकू, आंबे असायचे; त्यांनी अचानकच आमच्या छोट्या घरात टेंपो भरून फळं आणून टाकली. हातोहात संपली सगळी. यात कुठेही कशाच स्वरूपात मोबदला घ्यायची इच्छाच झाली नाही. शेवटी या शेतकर्यांनीच सुचवलं, 'दादा, एक तर तुम्ही हे सगळं करताय म्हणून आमच्याकडून त्याचे पैसे घ्या; किंवा आम्हीच तुमच्या सोसायटीत येतो'. अर्थात आम्ही दुसरा पर्याय स्वीकारला. इथे चिंतामणीदादांचे नांव आवर्जून घ्यावेसे वाटते. त्यांच्यापसूनच सुरुवात झाली, आधी चांदणी चौकात आणि मग भूगांवमध्येच चिंतामणीदादांसोबत हा प्रवास चालू झाला.
या उपक्रमात आजूबाजूच्या सोसायट्याही मैत्रिणींमुळे सामील झाल्या. शेतकर्यांना ऑर्डर एकत्रित पाहणे, पैशांचं रेकॉर्ड ठेवणे या सगळ्या गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून गीता आणि अमित या मित्र दांपत्याने स्वतः होऊन वेबसाईट तयार करून दिली. आणि आता या निमित्ताने इतके लोक/मित्र मैत्रिणी जोडल्या गेल्यात, की पूणे सोडताना आपलं गांव सोडून परत चालल्याचं दुःख होत होतं.
हे सगळं करत असताना इतकं शिकायला मिळत होतं, घरातून बाहेर जाणारा कचराही बर्यापैकी शुन्यावर आला होता. किचन, बाथरूमचं सगळं पाणी बागेला जात होतं. बर्याचशा देशी भाज्या (कुयरी, चणुला पावटा, चौधारी, अबई बबई, चांभार घेवडा इ.) गच्चीवरच उगवत होतो.
खूप वर्षांची चौघांचीही इच्छा होती, स्वतःचं शेत असावं. त्यात आपल्याला जे काही खायला लागतंय ते सगळं पिकवावं.
दीड वर्षापुर्वी शेतावर राहायला येऊन स्वप्नपूर्तीचा सोहळा साजरा करावा की समोर आलेल्या अडचणींचा डोंगर पाहून रडत बसावं, की तो पाहून परत मागे वळावं, की धैर्याने तो चढत राहावं अशी अवस्था झाली असतानाच, मुलींच्या पाठिंब्याने धैर्य आलं; पुण्यातल्या मित्र मैत्रिणींची साथही (किती नांव लिहू, लेख खूपच मोठा होऊन जाईल) इथे तग धरण्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. सगऴ्या अनपेक्षित अडचणींतून रस्ता शोधून मार्गक्रमण चालू आहे. यात पूर्ण कुटुंबाची भक्कम साथ आहे; विट्ठलची आई, माझे पप्पा, यांचे आशीर्वाद हीच आमची संपत्ती. भाऊ, बहिण,भाचरं,जवळचे मित्र-मैत्रिणी यांचेही पाठबळ तितकेच महत्त्वाचे आहे.
राहण्यासाठी दगडी, कौलारू, सारवलेले घर बांधणे (त़्यासाठी जुने घर स्वतः उतरून आणणे, शक्य तितका पुनर्वापर), उपेंद्रदादांच्या सल्ल्याने पाण्यासाठी बोअर, विहीर, शेतातली पाईपलाईन, इनामदार काकांनी प्रेमाने दिलेली वेगवेगळी देशी झाडे लावणे, ती जगवण्यासाठीचा आटापिटा, घराचे बांधकाम चालू असतानाच मुसळधार पावसात, गळक्या घरात दोघींना घेऊन राहणे, घरात लाईट कनेक्शन नसताना काढलेले दिवस, कनेक्शन घेतल्यानंतरही वायर ओढून घेतलेली लाईट-लागलेले विजेचे जोरदार झटके, प्यायच्या पाण्याचा, वापरण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न, वेगवेगऴ्या मानसिकतेचे गावाकडचे लोक, विट्ठलचा दर दोन तीन दिवसांनी पूणे-आळसंद रात्री/अपरात्रीचा प्रवास, शेतावरची धावपळ, स्वतः करून खाणे, सवयीचे झालेले घरात रोजच निघणारे विंचू, घरात धाकटी लेक एकटीच असताना आलेला नाग, या सगळ्या अग्निदिव्यातून पार पडत असतानाच पिकांचे तीन सीजन गेलेलेही समजले नाही. हे सगळं आठवलं तरी डोळ्यांत पाणी उभे राहते, अंगावर काटा येतो. या प्रवासात आमची हनु(कुत्रा) आणि तीन मांजरे, विहिरीतले विट्ठलने हाक मारली की वर येणारे मासे, यांची संगत लाभली/लाभते आहे..काहीतरी जुने लागेबांधे असावेत.
मसाल्यातली मोहरी, धणे, आले, हळद असो की वेगवेगळी तेलं, गहू असो की डाळी, जवस-कारळं देेशी लसूण-कांदाच काय अगदी मसूर मूग मटकी, राजगिरा, तीळ, शेंगदाणे, भाज्या असं सगळं स्वतःच पिकवलेलं. फक्त उडीद आणि ज्वारी विकत घ्यावी लागली. हे खूपच समाधानकारक आहे, स्वतः मातीत हात घालून कष्टाने पिकवलेलं खाण्यातलं सुख मुलींनाही समजतंय यापेक्षा दुसरं सुख ते काय!!
हे सगळं अभिमानाने पहायला माझी आई आणि विट्टलचे बाबा (आमचे अण्णा) सोबत हवे होते...त्यांची उणीव कधीच भरून न येणारी.
इवलेसे रोप, लावियले द्वारी...
मला तुमचा blog खुप आवडला
ReplyDeleteखूपच अप्रतिम journey
मनापासून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!!
All the Best!!
Wonderful journey. Hearty congratulations 👏
ReplyDeleteYou guys are an inspiration Pallavi. God bless you all.
ReplyDeleteतुमची चिकाटी खूप महत्वाची, आणि विशेष मन्हजे सर्वांचे समविचार असणे गरजेचे आहे.
ReplyDeleteखूप छान ,जेवढं वाचताना छान वाटत तेवढं सोपं नक्कीच नाही,खूप खूप शुभेच्छा
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDelete